Skip to main content

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

बौद्ध समाजातील अतिशय ज्वलंत व महत्वाच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला लावणारा तेलंगणा राज्यातील जयपाल वाघमारे या एका तरुण विचारवंताचा हा लेख प्रत्येकांनी आवर्जून वाचावा. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
______________________________________

ज्यांना समाजात तथागत बुद्धाच्या व बाबासाहेबांच्या विचारांने खरचं परिवर्तन व्हावे असे वाटते त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांचा अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार करावा मगच इतरांना ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करावा. कारण स्वतः अंगीकार न् करता केवळ इतरांना कोरडे ज्ञान सांगण्याला कवडीचाही अर्थ राहत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण गांभीर्याने समजून घेणे व यावर निष्पक्षपणे चर्चा होणे ही काळाची गरज आहे.
📘📗📕📙📘📗📕📕📘📗📕📙📘

तथागत बुद्धांच्या व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते की, या दोन्ही महामानवांनी आपल्या ज्ञानाने, आपल्या कार्याने संपूर्ण जगावर प्रभाव पाडला. जगाच्या कानाकोपऱ्यात बुद्धविचार पोहचला व बाबासाहेबांचा विचारही आज झपाट्याने जगात पुढे जात आहे. या दोन्ही महामानवांकडे जगाकडे पाहण्याची एक सम्यक दृष्टी होती आणि त्या दृष्टीसोबतच त्याग, समर्पन, नैतिकता या गोष्टीही होत्या. तथागत बुद्धांच्या व बाबासाहेबांच्या जीवनाकडे पाहीले तर या दोन्ही महामानवांच्या कार्यकालात हजारो वर्षाचे अंतर होते परंतु एवढे अंतर असूनही दोघांच्या जीवनकार्यात खूप मोठ्या प्रमाणात साम्य (Similarities) होते. म्हणूनच बाबासाहेबांना काही विद्वान विचारवंत 'आधुनिक बुद्ध' म्हणून संबोधतात. कारण, या दोन्ही महामानवांच्या पारिवारिक जीवनात जसे साम्य होते तसेच सामाजिक व वैयक्तिक जीवनातही साम्य होते. जसे, तथागत बुद्धाची माता महामाया जशा बुद्धाच्या बालपणी निर्वाण पावल्या तशाच बाबासाहेबांची माता 'भीमाई' या देखील बाबासाहेबांच्या बालपणीच निर्वाण पावल्या. या दोन्ही महामानवांचे बालपणातील संगोपन त्यांच्याच नातेवाईकातील व्यक्तीने केले. तथागत बुद्धांचे संगोपन त्यांच्या मावशी 'महाप्रजापती गोतमीने' तर बाबासाहेबांचे संगोपन त्यांची आत्या 'मीराबाई' यांनी केले. तथागत बुद्धांच्या जीवनाला 'रोहीणी नदीच्या' पाण्यामुळे कलाटणी मिळाली तर बाबासाहेबांच्या जीवनातील पाण्यासाठीच केलेला 'महाडचा पहिला सत्याग्रह' यामुळे कलाटणी मिळाली. इथूनच या दोन्ही महामानवांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. अशाप्रकारचे साम्य असले तरीही हा केवळ योगायोग समजण्यात यावा. यात कुठलीही अंधश्रद्धा किंवा चमत्कार वगैरे काही नाही. परंतु सदर प्रकारचे साम्य सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की, या दोन्ही महामानवांचे जीवन व विचार हे ज्या कारणामुळे व ज्या काही चांगल्या मानवी सदगुणांमुळे व्यापक होऊन ते संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले व आजही त्यांचे विचार, सद्गुण, ती आदर्श तत्वं दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत ती तत्वं सुद्धा या दोन्ही महापुरुषांच्या जीवनात एकसारखीच होती. या तत्त्वांच्या बाबतीत जी या दोघांत साम्यता होती ती इथे आवर्जून सांगण्यासारखी आहेत.

ती तत्वं म्हणजे 1. प्रज्ञा 2. शील 3. करुणा 4. न्याय 5. समता 6. स्वातंत्र्यता 7. बंधुता 8. अंमलबजावणी/अंगीकारणे 9. करुणाबुद्धी 10. त्याग व समर्पण या मानवी जीवन सुखकर करणाऱ्या सद्गुणांचा बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर त्यांनी आपल्या जीवनात अंगीकार केला, या तत्वांची अगोदर आपल्या जीवनात काटेकोरपणे अंमलबजावणी केली व नंतरच ती तत्वं संपूर्ण जगाला सांगितली. म्हणून त्यांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव जगावर पडला व तो प्रभाव आता दिवसेंदिवस वाढत आहे. याचं एकमेव मूळ कारण म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी चांगल्या विचारांचा व तत्वांचा केवळ जयजयकार केला नाही तर त्या विचारांचा अगोदर आपल्या जीवनात अंगीकार केला. या चांगल्या विचारांवर, तत्वांवर अगोदर स्वतः जीवनात चालून पाहीले. मगच ते इतरांना सांगीतले म्हणूनच त्यांचे विचार जगाने ऐकले व स्विकारले. त्यांच्या विचारांचा प्रभाव जगावर पडण्याचं कारण म्हणजे त्यांनी अगोदर स्वतःच्या जीवनात अंगीकार केला व नंतर ते जगाला सांगितले. परंतु आज बाबासाहेबांचा विचार सांगणारे विचारवंत, लेखक, वक्ते, विश्लेषक, अभ्यासक, नेते कार्यकर्ते, उपासक, सामान्य नागरिक, तरूण वर्ग हे लाखो करोडोंच्या संख्येने आहेत. परंतु आज म्हणावं तसे परिवर्तन घडताना दिसून येत नाही. त्याचं कारण म्हणजे आजचे सर्वच नसले तरीही बहुतांश लोकांच्या केवळ तोंडात 'बुद्ध' व 'बाबासाहेब' आहे, कृतीत अजिबात नाही, अंगीकारण्यात नाही. हे त्यांचं महत्वाचं कारण आहे आणि म्हणूण ही महत्त्वाची बाब समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जवळपास प्रत्येकच व्यक्तीचे विचार हे चांगले असतात. परंतु त्या चांगल्या विचारांवर चालणारे, त्यावर अंमल करणारे कितीजण असतात.? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विचारांवर चालणाऱ्या लोकांची संख्या अगदी नगण्य आहे म्हणून समाजात परिवर्तन होताना दिसून येत नाही. ही मुलभूत बाब समजून घेणे गरजेचे आहे. सध्याचा बदलता काळच असा आहे की, कोणत्याही धर्माच्या, महापुरुषांच्या शिकवणी प्रमाणे शंभर टक्के आचरण कोणालाही करणे शक्य नाही आणि जर कोणत्या धर्माचा अनुयायी मी माझ्या धर्माच्या शिकवणीप्रमाणे आजही शंभर टक्के आचरण करतो असे म्हणत असेल तर तो मुर्खच म्हणावा लागेल. मग तो कोणत्याही धर्माचा व महापुरुषांचा अनुयायी का असेना. म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर 'माणूस' हा मुळातच आपल्या गरजेनुसार व आपल्या सोयीनुसार वागतो. नंतर तो एखाद्या धर्माचा किंवा महापुरुषांचा फारच कट्टर अनुयायी असेल तर तो त्याप्रमाणे थोडेबहुत वागतो. अशी माणसं आज वर्तमान परिस्थितीत सर्वच समाजात आहेत. परंतु अशी माणसं आज आपल्या समाजातही मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. अशी माणसं किंवा अशाप्रकारचे अनुयायी हे बाबासाहेबांच्या समाजात तयार व्हायला नको होती परंतु दुर्दैवाने ती याच समाजात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. इथे प्रत्येकजणच म्हणतोय की, 'मी म्हणेल तोच खरा आंबेडकरवाद', मी म्हणेल तीच पुर्व दिशा. असं म्हणण्याचं एकमेव कारण म्हणजे अहंकार (Ego) गर्व, घमंड, स्वतःला सर्वोच्च स्थानी ठेवण्याची किंवा स्वतःला इतरांपेक्षा 'श्रेष्ठ', किंवा मीच इतरांपेक्षा 'जास्त ज्ञानी' आहे ही दाखवण्याची भावना, मी म्हणेल तेच खरं म्हणण्याची आत्मकेंद्रित Self-centred वृत्ती.

ही भावनाच आज आपला सर्वात मोठा शत्रू आहे. आपल्या मनातील ही भावना आपण समूळपणे नष्ट केल्याशिवाय आपण आपल्या बाहेरील शत्रूसोबत सामना करू शकत नाही व त्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. जसं बाबासाहेब म्हणायचे की, " एखादा आणीबाणीसारखा प्रसंग निर्माण झाला तर देशाच्या हिताला प्राधान्य द्यायचं की माझ्या वैयक्तिक हिताला प्राधान्य द्यायचं असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला तर मी अगोदर देशहिताला प्रथम प्राधान्य देईल परंतु त्याऐवजी देशहित प्रथम की माझ्या समाजाचे हित प्रथम असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला तर मी माझ्या समाजाच्या हिताला प्रथमतः प्राधान्य देईल असं बाबासाहेब म्हणाले होते. यातून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळतेय ती म्हणजे "समाजहितासाठी किंवा समाजपरिवर्तनासाठी आपल्याला अगोदर आपल्यातील शत्रूसोबत लढावं लागेल. आपल्यातील शत्रू म्हणजे आपल्यातील गर्व, घमंड, अहंकार (Ego) एकजुटीचा अभाव, मी म्हणेल तेच खरं म्हणण्याची आत्मकेंद्रित वृत्ती, समाजकार्य करत असताना स्वतःला सर्वोच्च स्थानी ठेवण्याची व स्वतःला इतरांपेक्षा 'विशेष' व 'श्रेष्ठ' मानण्याची भावना, आपल्याच समाजबांधवाचा द्वेष, आपल्याच समाजबांधवाची माघारी निंदानालस्ती, आपल्याच समाजबांधवांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणे, त्याच्या चांगल्या गोष्टीत, चांगल्या कार्यात मदत/सहकार्य न् करणे, आपल्याच समाजबांधवावर टिकाटिप्पणी करणे, समाजकार्याच्या नावावर समाजाकडून पैसा काढणे, समाजात एखादं बुद्धीजीवी व्यक्तीमत्वं असेल तर त्याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी न् देणे, जर दिलीच तर त्याच्या नेतृत्वावर जळणे, त्याच्याविषयी आपसात गैरसमज निर्माण करणे, त्याच्याविषयी नेटवर्कमध्ये गैरसमज व नकारात्मकता पसरविणे, श्रेय घेण्यासाठी धडपडणे किंवा सर्वांनी माझीच स्तुती, माझीच वाहवा करावी अशी अपेक्षा ठेवणे, माझे नाव पुढे आले तरच मी कार्यात सहभागी होतो अन्यथा नाही अशी स्वार्थीपणाची भावना बाळगणे, आपल्याच नेटवर्क मधील लोकांविषयी गैरसमज पसरविणे, समाजातील एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक व पारिवारिक गोष्टीवरून त्याला कमी जास्त लेखणे, आपल्याच समाजात गरीब-श्रीमंत ही दरी पाडून असमानता निर्माण करणे. गरिबी-श्रीमंतीच्या कारणावरून आपापल्यातच रोटी-बेटी व्यवहार न् करणे, पोटजाती पाळणे. इत्यादी प्रकारच्या अशा अनेक अनैतिक गोष्टी आपल्यातच आहेत. म्हणूण याच कारणामुळे आपल्याच समाजात 'बंधुत्वं' निर्माण होत नाही. 'बंधुत्वं' नाही म्हणून एकी नाही. एकी नाही म्हणून संघटन निर्माण होत नाही. संघटन निर्माण होत नाही म्हणून आपले प्रश्न मिटत नाहीत. तर दिवसेंदिवस आपले प्रश्न जास्त उग्र रूप धारण करत आहेत. आपलाच येणारा भविष्यकाळ हा आपल्याला अंधकारमय दिसतो आहे. या सर्व समस्या समाजात एकजूट नसल्यामुळे निर्माण होत आहेत आणि त्यास केवळ आपण सर्वजण जबाबदार आहोत. आपल्याच वागण्या बोलण्यामुळे, आपल्याच संकुचित विचारामुळे आपल्यातीलच काही बांधव समाजकार्यापासून चार हात दूर राहणेच पसंत करत आहेत. समाजात काही लोक अशी आहेत ज्यांच्या अंगी थोडीही माणूसकी नाही अन् अशी माणसं समाजसेवा करायला निघायलेत. अशी माणसं समाजात 'बंधुभाव' कसा निर्माण करतील. या लोकांना बाबासाहेबांची मानवतावादी चळवळ खरोखरच समजली की नाही अशी शंका येते. कोणतीही चळवळ किंवा इतिहास समजण्यासाठी तो अगोदर वाचावा लागतो. व्यवस्थित समजून घ्यावा लागतो व समजून घेतलेल्या विचारांचा प्रथम आपल्या जीवनात अंगीकार करावा लागतो. तरच चार लोक तुमच्यामुळे बदलू शकतात. त्यांच्यात सकारात्मक बदल घडू शकतो. ही वास्तविकता कोणीही नाकारू शकत नाही. 

काही माणसं चळवळीत, समाजकार्यात स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ घेऊन येतात. प्रत्येक कामाचं श्रेय केवळ मलाच मिळावे अशी स्वार्थी आस मनाशी बाळगतात. काम कमी परंतु काम केल्याचा दिखावा जास्त करणे आणि श्रेय घ्यायला पुढे येणे ही काहीजणांची वृत्ती समाजासाठी घातक ठरतेय. काही माणसं अशा प्रकारची आहेत ते स्वतःही काम करत नाहीत आणि इतरांना पण काम करू देत नाहीत. फक्त एकमेकांच्या सकारात्मक गोष्टी न् पाहता केवळ नकारात्मक गोष्टी पाहून त्यांच्याविषयी जाणुनबुजून गैरसमज पसरविणे व त्या माणसाला नाउमेद व निरूत्साही करून टाकणे. जेणेकरून तो व्यक्ती पुन्हा समाजकार्यात, चळवळीत भागच घेतला नाही पाहिजे. अशाप्रकारचीही काही माणसं आहेत. म्हणून आपल्या समाजात प्रथमतः 'बंधुभाव' निर्माण करण्यासाठी नेमके कोणते अडथळे मध्ये येत आहेत त्याचा सारासार विचार करून ते नेमके दूर कसे होतील याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तरच आपण बाबासाहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज होऊ अन्यथा काहीच होणार नाहीं. नाहीतर चळवळीच्या नावावर केवळ मनोरंजन होईल, काहीजणांचे पोटं भरतील. याव्यतिरिक्त दुसरे काहीही साध्य होणार नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला स्विकारावी लागेलच. 

बाबासाहेब नेहमी म्हणायचे की, "बुद्धीमान नसली तरी चालतील परंतु मला निष्ठावान माणसं पाहीजेत. त्यांच्यातील बुद्धीची उणीव मी भरून काढीन". बाबासाहेबांच्या या विचारातून त्यांनी आपल्याला 'निष्ठा', 'प्रामाणिकपणा', 'समाजाशी बांधिलकी' या गोष्टीला बुद्धीमत्तेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याचे समजते. म्हणून आपल्या समाजातील चळवळीत, समाजकार्यात काम करू इच्छिणाऱ्या व्यक्तीनी ज्ञान मिळवून बुद्धीमत्ता तर वाढविली पाहिजेच परंतु त्यासोबतच प्रामाणिकपणा व निष्ठावान रहावयास शिकले पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की, बाबासाहेबांसोबत जी माणसं होती ती शिक्षणाने, बुद्धीने कमी होती परंतु बहुतांश माणसं निष्ठावान व प्रामाणिक होती. म्हणून तर त्यांनी इतिहास घडविला. आज वर्तमान परिस्थितीत आपल्या समाजात लाखो करोडों माणसं मोठे उच्चशिक्षीत, उच्चविद्याविभूषित, आर्थिक बाबतीत सधन आहेत परंतु त्यांच्यात सामाजिक बांधिलकी नाही. सामाजिक बांधिलकी नाही म्हणून समाजासाठी काही विधायक कार्य करावं अशी त्यांची भावना नाही. अशा लोकात सामाजिक बांधिलकी नसण्याचं कारण म्हणजे या लोकांनी बाबासाहेबांच्या इतिहासाकडे, त्यांच्या विचाराकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. म्हणून त्यांच्यात सामाजिक बांधिलकी नाही. आणि जे थोडेफार लोक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजसेवा, समाजकार्य करू इच्छितात ते थोडाफार समाजकार्यात सहभाग घेतात परंतु त्यांच्यातच हेवेदावे, गर्व, अहंकार, टोकाचे मतभेद आहेत. प्रत्येकाला नेतृत्व करण्याची हाव आहे. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा कोणालाच नाही. प्रत्येकाला नेता होऊ वाटत आहे. म्हणून आपल्या समाजात घरोघर नेते व प्रत्येक गल्लीबोळात वेगवेगळ्या संघटना निर्माण होत आहेत. याला संघटना म्हणायला लाज वाटते. या संघटना नसून बाबासाहेबांच्या नावाने दुकानदारी चालू आहे. इथे प्रत्येकजण बाबासाहेबांच्या नावावर संघटना काढून त्यातून आपला स्वार्थ साधत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी व समाजासाठी तितकीच घातक अशी बाब आहे. एवढ्या जास्त संघटना निर्माण होण्याचं व गल्लीबोळात नेते निर्माण होण्याचं कारण म्हणजे अशा लोकांना बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा स्वतःचा स्वार्थ महत्वाचा वाटत आहे. स्वार्थ आहे म्हणूनच तर संघटना, (दुकानदाऱ्या), आणि चिल्लर, दर्जाहीन नेते निर्माण होत आहेत. अशा नेत्यांना बाबासाहेबांच्या विचारांचा ना अभ्यास ना बुद्धीमत्ता ना यांच्या अंगी निष्ठा. यापैकी काहीच नाही म्हणून तर समाजात परिवर्तन व सकारात्मक बदल घडून येताना दिसत नाही. या महत्वपूर्ण विषयांवर जास्तीत जास्त चर्चा व्हायला पाहिजे. चर्चा होऊन त्यावर काही तोडगा काढला पाहिजे. तरच काहीतरी सकारात्मक बदल समाजात दिसून येईल. नाहीतर आपल्यातील ही अडथळे जशास तसे ठेवून व त्याकडे दुर्लक्ष करून केवळ आर. एस. एस., बीजेपी, कांग्रेस, उच्चवर्णीय जातीवर प्रस्थापित लोकांवर रोज टिकाटिप्पणी करून काहीही अर्थ होणार नाही. त्यांचा विरोध करण्याआधी स्वतःच्या समाजाला सक्षम बनविले पाहिजे. आपली शक्ती आहे परंतु ती आपसातील हेवेदावे, मतभेदांमुळे ती विखुरलेली आहे. अगोदर आपल्यातील उणीवा दूर केल्याशिवाय आपण आपली शक्ती निर्माण करू शकत नाही. ही सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला स्विकारावीच लागेल. 

या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वांवर प्रथम आपल्या समाजाला उभं करावं लागेल. या तत्त्वांवर आधारित असणारा समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. तरच समाजात व देशात परिवर्तन घडून येईल. कारण, कोणताही बदल अगोदर आपल्या स्वतःपासून, आपल्या समाजापासून करावा
 लागतो. त्याशिवाय परिवर्तन घडत नसते. समाजपरिवर्तनाचा हा मुलभूत सिद्धांत आपल्याला स्विकारावाच लागेल. तरच परिवर्तन शक्य आहे अन्यथा नाही असे माझे स्पष्ट मत आहे. 

जयपाल वाघमारे 
(तरूण विचारवंत, आदिलाबाद तेलंगणा.)

Comments