समाजसेवा, समाजकारण या गोंडस नावाखाली आपल्या समाजातील तरूणांकडून होणारी चमचेगिरी व चमकोगिरी आणि त्याचे स्वरूप.
सध्याच्या वर्तमान राजकारणात कार्यकर्त्याची असलेली अवस्था.
पुर्वी अज्ञानी व देवभोळे लोकं देवाधर्माचे भक्त असायचे. परंतु आज आपल्या समाजातील तरुण आपल्या आसपासच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा भक्त झाला आहे. आसपासचे आमदार, खासदार, पंचायत समित्यांचे सभापती, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, गल्लीबोळातील नेते, कार्यकर्ते, 'आमचे आण्णा', 'आमचे भाऊ', 'आमचे मित्र', 'हमारे भय्या', 'उभरतं नेतृत्व', खंबीर नेतृत्व यांचा तो भक्त झाला आहे. सोशल मीडियावर तर अशा भक्तांचा अक्षरशः उत आलाय. ना विचार, ना ध्येय, ना कोणत्या गोष्टीचे यथोचित ज्ञान, ना स्वाभिमान. यापैकी जवळ काहीच नसताना समाजातले तरुण कुणाचे ना कुणाचे भक्त होऊन सोशल मिडीयावर चमकोगिरी आणि चमचेगिरी करताना सर्रासपणे दिसून येत आहेत.
ही परिस्थिती केवळ एक-दोन गावची तालुक्याची, जिल्ह्याची किंवा विशिष्ट अशा एका जातीतल्या तरूणांची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची, देशाची आहे. सर्वत्रच ह्या अशा अंधभक्ताचाच सुळसुळाट झाला आहे. ही भक्त मंडळी समाजकार्याच्या नावावर चमकोगिरी करत असतात. हीच त्यांची समाजसेवा. समाजसेवेचं गोंडस नाव देऊन ही भक्तमंडळी हुजरेगिरी व चमकोगिरी सध्या मोठ्या प्रमाणात करताहेत आणि त्यांच्या या प्रकारास आपले खेड्यापाड्यातील अज्ञानी, अशिक्षित, अर्धशिक्षित समाजबांधव बळी पडत आहेत. ही फार मोठी शोकांतिका आहे.
ज्या लोकांना नेता, नेतृत्व व समाजसेवा म्हणजे काय हे किंचितही माहित नाही. अशी अक्कलशुन्य लोकं आजकाल स्वतःला नेते म्हणवून मिरवित आहेत. दोन खादीचे पांढरे ड्रेस, गळ्यात एखादं सोन्याचं लॉकेट, हाताच्या बोटात अंगठ्या, चष्मा, कपाळावर आडवे-उभे गुलालाचे पट्टे मारून, हात वर करून फोटो काढायच्या आणि त्या फोटो फेसबुक, व्हाट्सएप सारख्या सोशल मीडियावर येऊन मोठमोठ्या गोष्टी लिहून टाकायच्या, मोठ्या लोकांच्या, राजकारण्यांच्या पुढे पुढे करून, त्यांची हुजरेगिरी करून, त्यांच्या वाढदिवसाला हारतुरे घेऊन जाऊन, त्यांची गुलामी करून ओळखी करून घ्यायच्या अन् त्यांच्या सोबत फोटो काढून घेऊन त्या फेसबुक व अन्य माध्यमावर टाकायच्या. फेसबुकवर तासनतास रिकाम्या लोकांच्या लाईक्स, कमेंट्स मिळवायच्या, ऐकमेकांचे बळच वाढदिवसं साजरे करायचे. अशाप्रकारचे अतिशय भिकारचोट प्रकार करायचे. हीच यांची समाजसेवा. हीच त्यांची नेतागिरी. हीच त्यांची "हाक तुमची साथ आमची".
यातील अत्यंत विशेष बाब म्हणजे हा वरील सर्व खटाटोप समाजसेवेसाठी नसून स्वतःच्या स्वार्थासाठी व स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी असतो. भोळ्या-भाबड्या आशेने, स्वार्थी भावनेने, राजकारणात आपल्या हाती काही ना काही लागेल म्हणून, कुठेतरी, केव्हातरी मलिदा खायला भेटेल म्हणून समाजसेवेच्या नावाखाली आजचा तरुण भरकटत चालला आहे व दिशाहीन झाला आहे. त्याला आपल्याप्रती, कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीचा विसर पडत चालला असून तो इतरांचं पाहून राजकारणाच्या मायाजालात फसत चालला आहे. ज्या राजकारणात बोटावर मोजता येतील एवढ्या लोकांचा उद्धार झाला आहे आणि लाखो लोक यामुळे अक्षरशः उघड्यावर आले आहेत. अशा राजकारणात आजचा तरुण कूठल्याही अक्कलशुन्य माणसाच्या नादी लागून आपले भविष्य उद्ध्वस्त करून घेत आहे.
तसे राजकारणात येणे वाईट नाही. बाबासाहेब म्हणतात, "आपल्या उच्चशिक्षित, बुद्धीजीवी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. जर बुद्धीजीवी वर्ग राजकारणापासून दूर राहीला तर अयोग्य व अज्ञानी लोक तुमच्यावर राज करतील". पुढे बाबासाहेब असेही म्हणतात की, तरूणांनी सार्वजनिक जीवनात येण्याअगोदर स्वतः उच्चशिक्षित व्हावे, स्वावलंबी व्हावे आणि स्वतःप्रती असलेल्या जबाबदाऱ्या प्रथमतः पार पाडाव्यात आणि नंतरच राजकारणात यावे व समाजास योग्य ती दिशा द्यावी".
आता बाबासाहेबांच्या या विचाराला अनुसरून आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आजची परिस्थिती या विचाराच्या अगदी उलट आणि विपरीत आहे. आजचा तरुण उच्चशिक्षित होणे तर दूरच राहीले, परंतु तो चांगला शिक्षितही नाही. त्याला समाजाप्रती तळमळ कमी आणि स्वतःप्रती जास्त आहे, त्याच्यात शासक व्हायची लायकी नसून तो गुलाम होण्याच्या लायकीचा आहे. तो स्वतःच दिशाहीन आणि गोंधळलेला असून तो समाजाला दिशा देऊ शकेल एवढं सामर्थ्य त्याच्यात नाही. त्याच्यात राजकारणाविषयीची जागृती ही समाजाचे दुख, वेदना पाहून आली नाही तर त्याच्यात ही जागृती इतरांचं पोझिशन, इतरांचं समाजातलं वर्चस्व, इतरांची आर्थिक स्थिती, गाड्या, घोड्या ह्या भौतिक गोष्टी पाहून अत्यंत स्वार्थी भावनेने ही जागृती आली आहे. याच भावनेने तो राजकारणात येत आहे. राजकारणात येण्याचा त्याचा आधारच अत्यंत कच्चा आहे. अशी सारी एकूण परिस्थिती आहे. याच स्वार्थी भावनेने आजकाल लोक राजकारण करत आहेत. त्यांना समाजाचं, समाजातील तरुणांच्या भविष्याचं कसलही देणेघेणे नसून ते आपला स्वार्थ साधण्यासाठी, पक्ष वाढविण्यासाठी, स्वतःचा जयजयकार करवण्यासाठी, स्वतःचा उदोउदो करवून घेण्यासाठी तरूणांना नादी लावत आहेत. यास मोठमोठ्या नेत्यापासून ते गल्लीबोळातील नेते, कार्यकर्ते कोणीही अपवाद नाहीत. फक्त आणि फक्त याच स्वार्थापोटी तो समाजसेवेच्या नावाखाली समाजकारण, राजकारण करत आहे. म्हणून आजच्या तरुणांनी असल्या राजकारण्यांच्या, स्वंयघोषित नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, आण्णाच्या, दादाच्या, भावाच्या, उभरत्या नेतृत्वाच्या, खंबीर नेतृत्वाच्या, तरूण तडफदार नेतृत्वाच्या नादी लागून, त्यांची चमचागिरी करून आपले भविष्य बरबाद करून घेऊ नये आणि विनाकारण कुणालाही मोठे करू नये.
अँड. के.टी.चावरे
मो.9309770054
Comments
Post a Comment